ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मात्र ते राजीनामा का देत नाहीत? खा.सुळेंची मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून बीड जिल्ह्यातील खून प्रकरणाने विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले असतांना आता बीड जिल्हा नियोजन समितीची आज उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण, पिक विमा घोटाळा आणि हार्वेस्टर साठी शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आलेल्या पैशांच्या संदर्भात चर्चा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी चौकशीची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. तसेच पिक विमा आणि हार्वेस्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या पैशांच्या संदर्भात देखील लोकप्रतिनिधी सातत्याने आवाज उठवत आहेत. यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा अशा अनेक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. या सर्वांनी बाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा करावी, अशी आमची मागणी असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी पुन्हा एकदा केली आहे. नैतिकेच्या मुद्द्यावर या प्रकरणात मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. मात्र ते राजीनामा का देत नाहीत? हे त्यांनाच विचारा, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या सोबतच धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील एकूणच परिस्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कदाचित माहिती नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांसह सत्ताधारी पक्षांच्या खासदारांना सोबत घेऊन आपण अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तुमच्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे काय सुरू आहे, याची माहिती आपण अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना देणार आहे. तसेच संसदेमध्ये देखील याविषयी प्रश्न मांडणार असल्याची माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!