सोलापूर : वृत्तसंस्था
शहरातील बाळे येथील कारंबा रोडवरील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पालगत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामांसाठी एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या केबल डक्टला शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. यामुळे धूराचे लोट शहरात पसरल्याचे दिसून आले. तब्बल ६ तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाला अखेर ही आग विझवण्यात यश आले.
एकीकडे तुळजापूर रोडवरील कचरा डेपोस आग लागली आणि दुसरीकडे केबल डक्टलाही आग लागल्याने अग्निशामक दलाची चांगलीच धावपळ उडाली. कचरा डेपोबरोबरच डक्टच्या आगीमुळे शेजारील जैव वैद्यकीय कचराही पेटल्याची घटना घडली. यामुळे शहर परिसरात धुराचे लोट पसरले होते. मात्र या बाबत उलट सुलट चर्चा होत आहे. सोलापुरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामांसाठी लागणारे केबल डक्ट मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. त्यास अचानक आग लागली या आगीमध्ये लाखो रुपये किमतीचे केबल डक्ट जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे हे घटनास्थळी दाखल झाले. डक्टच्या आगीमुळे शेजारीच असलेल्या जैव वैद्यकीय कचऱ्यासही आग लागली. ती तातडीने अग्निशामक दलाने पाणी मारून विझविली. या डक्टला भीषण आग लागल्यानंतर धूराचे लोट संपूर्ण शहरात पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे नेमकी कुठे आणि कशाला आग लागली? याची चर्चा सोलापूर शहरात सुरू होती.
यापूर्वी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठेवण्यात आलेल्या केबल डक्टरला होम मैदान परिसरात देखील आग लागली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी हे केबल डक्ट कारंबा रोडवरील जैव वैद्यकीय कचरा डेपो लगत परिसरात ठेवण्यात आले. पण, तिथेही पुन्हा त्याला आग लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी मरीआई चौक येथेही अशा केबल डक्टला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.