ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करा; भाजपच्या खासदाराचे लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाच्या रद्दबातल करण्याची आणि आयुष्यभर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर करण्याची नोटीस दिली आहे.

संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दुबे यांनी स्पष्ट केले की, ही केवळ हक्कभंगाची नोटीस नसून एक स्वतंत्र प्रस्ताव आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यांदरम्यान सोरोस फाउंडेशन, यूएसएआयडी आणि फोर्ड फाउंडेशन यांसारख्या संस्थांशी संपर्कात असतात आणि भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी करतात, असा आरोप त्यांनी केला. थायलंड, व्हिएतनाम आणि कंबोडिया यांसारख्या देशांतील गांधी यांच्या दौऱ्यांबाबतही संशय व्यक्त करत ते देशाच्या हिताला घातक असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.

लोकसभेच्या कामकाजात ‘स्वतंत्र प्रस्ताव’ हा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सभागृहाचे मत किंवा निर्णय घेण्यासाठी मांडला जाणारा प्रस्ताव असतो. दुबे यांनी लावलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने या प्रस्तावावर लोकसभा अध्यक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या प्रस्तावावरून संसदेत तीव्र राजकीय वाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!