मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मतदानापूर्वीच पैशांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत तब्बल १० लाख ९ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नालासोपारा शहरात एकच खळबळ उडाली असून, बहुजन विकास आघाडीने (बविआ) थेट शिवसेना आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पेल्हार ब्रिज परिसरात पोलीस गस्त सुरू असताना दोन तरुण दोन ॲक्टिव्हा दुचाकींवरून संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून झडती घेतली असता एका प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाच्या पाकिटांमध्ये भरलेली मोठी रोख रक्कम सापडली. ही रक्कम १० लाख ९ हजार रुपये इतकी होती. पैशांबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेऊन रोकड आणि दुचाकी जप्त केल्या.
या घटनेनंतर बहुजन विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक १९ चे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनासमोर धक्कादायक आरोप केले. त्यांनी सांगितले की, ही रोकड एका आलिशान फॉर्च्युनर गाडीतून या दुचाकीस्वारांना देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या फॉर्च्युनर वाहनावर ‘शिवसेना जिल्हाध्यक्ष’ अशी पाटी लावलेली होती, असा दावाही त्यांनी केला.
प्रफुल्ल पाटील यांच्या म्हणण्यानुसार, आमच्या कार्यकर्त्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे दोन पिशव्या होत्या. एका पिशवीत प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या याद्या होत्या, तर दुसऱ्या पिशवीवर स्पष्टपणे ‘भाजपा’ असे लिहिलेले होते. त्या पिशवीत ५२ पाकिटे असून, मतदारांना वाटण्यासाठी पैसे भरले होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, पेल्हार पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १७३ अंतर्गत, निवडणुकीत लाच देणे किंवा स्वीकारणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, ताब्यात घेतलेल्या तरुणांचे कॉल रेकॉर्ड्स आणि पैशांचा स्रोत यांची सखोल चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला असून, सत्ताधारी गटाने हे सर्व आरोप फेटाळून लावत हा बदनामीचा कट असल्याचे म्हटले आहे.