मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून आता भारतीय हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस पुन्हा एकदा राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. दरम्यान येत्या २४ ते ४८ तासांत राज्यातील काही भागांत सर्तकतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज ३ ऑगस्ट आणि उद्या ४ ऑगस्ट रोजी मध्यमहाराष्ट्रातील घाट भागात आणि उत्तर कोकणात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याची सूचना देखील हवामान विभागाने या भागांत दिली आहे. आयएमडीने दिलेल्या बुलेटिननुसार, शनिवार ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्टपर्यंत एकत्रित राज्यभर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी वाढण्याची शक्यता आहे. तसेच महराष्ट्राच्या अंतर्गत भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत कोकण विभागाच्या काही भागांमध्ये (पालघर, ठाणे, मुंबईच्या आसपास) आणि मध्यमहाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
‘या’ भागांना अलर्ट
रेड अलर्ट: ३ ऑगस्ट – सातारा, ४ ऑगस्ट – सातारा,
पुणे आणि पालघर
ऑरेंज अलर्ट: ३ ऑगस्ट – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि
कोल्हापूर, ४ ऑगस्ट – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, ५ ऑगस्ट – सातारा
यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट ), कोल्हापूर (४ ऑगस्ट) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर (५ ऑगस्ट ), रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा (दि. ६ ऑगस्ट)