नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) कडून १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये तिसरी ते सहावी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके जारी केली जाणार आहेत. इतर इयत्तांच्या अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याचे सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
एनसीईआरटीकडून तिसरी ते सहावीपर्यंतच्या इयत्तांसाठी 1 नवीन अभ्यासक्रमावर काम सुरू आहे. लवकरच हा अभ्यासक्रम जारी केला जाणार असल्याचे नमूद करत सीबीएसईने संबंधित शाळांना याबाबत पत्र पाठवले आहे. शाळांनी वर्ष २०२३ पर्यंत एनसीईआरटीकडून प्रकाशित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांऐवजी तिसरी ते सहावीच्या वर्गासाठी जारी होणाऱ्या नवीन अभ्यासक्रम व पुस्तकांचा अवलंब करावा, असे सीबीएसईचे संचालक (शैक्षणिक) जोसेफ इमॅन्युअल यांनी पत्रात म्हटले आहे. नवीन अभ्यासक्रम शिकताना जड जाऊ नये, यासाठी एनसीईआरटी सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स आणि तिसरीच्या वर्गासाठी संक्षिप्त दिशानिर्देश तयार केले जात आहे. एनसीईआरटीकडून अभ्यासक्रम मिळाल्यानंतर सर्व शाळांना ते ऑनलाइन पाठवले जाईल. सीबीएसईकडून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रमाचे आयोजनदेखील केले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणाच्या नवीन पद्धतीची क्षमता कार्यक्रमातून ओळख करून दिली जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्यासाठी सहावी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम तर्कसंगत केला होता.