ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साजरा ; पालखी मिरवणुकीने वेधले भाविकांचे लक्ष 

अक्कलकोट, दि.६ : माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा, श्री गुरुप्रतिपदा, दत्त सांप्रदायेतील तिसरे अवतार तथा येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचा महानिर्वाण दिन. यानिमित्त सालाबादाप्रमाणे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. शहरातील पालखी मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन पुजारी व मंदार पुजारी यांच्या विधीवत आरतीने पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती व महेश इंगळे यांच्या हस्ते मंदार महाराज व ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात सकाळी ८:३० वाजता श्रींच्या चरणी पारंपरिक विधिवत देवस्थानचे लघुरुद्र झाले. पहाटे ५ च्या काकड आरतीनंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरतीने श्रींना महानैवेद्य अर्पण करून भक्त निवास येथे स्वामी भक्ताना भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो स्वामी भक्तांनी या भोजन प्रसादाचा लाभ घेतला.गुरुप्रतिपदेच्या मुहूर्तावर दिवसभर हजारो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेऊन या दिवशी धन्य झाले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकारिता मंदिर समितीच्यावतीने कर्मचारी व सेवेकरी प्रयत्नशील होते. सायंकाळी ५ वाजता श्रींच्या सजविलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात देवस्थानचे पुजारी मोहन महाराज, मंदार महाराज यांच्या हस्ते आरती करून देवस्थानचे चेअरमन इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांचे हस्ते पालखी पूजन करून पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

ही पालखी मिरवणुक फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधि मठ, परतीचा मार्ग कारंजा चौक, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, मधला मारुती, भारत गल्ली, देशमुख गल्ली, मार्गे वटवृक्ष मंदिरात रात्री साडे नऊ वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर गुरु भजन होवून उपस्थित सर्व भाविकांना मंदिर समितीच्यावतीने शिरा प्रसाद वाटप करून या गुरूप्रतिपदा उत्सव कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे,श्रीशैल गवंंडी, चंद्र्कांत गवंडी, शशिकांत लिंबीतोटे, प्रदिप हिंडोळे, दिपक जरिपटके, शिवशरण अचलेर,संजय पवार, श्रीशैल गवंडी,लखन सुरवसे, नरसिंग क्षीरसागर, दादा सावंत, नागनाथ जेऊरे आदींसह देवस्थानचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!