उत्तर सोलापूर : जिल्हा परिषदेचे उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच जनसंजीवनी अभियानाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काल संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जनसंजीवनी अभियानाची शपथ घेतली होती. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात स्वच्छता व इतर आरोग्य सेवा सक्षमीकरणाच्या कामांना सुरुवात केली होती. या अभियानाच्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने सीईओ स्वामी हे आज सकाळी 9-30 वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. याप्रसंगी सीईओ स्वामी यांच्या समवेत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शेगर, बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र डॉ. अमित पाटील आदी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्याठिकाणी सीईओ स्वामी यांचे स्वागत मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे यांनी केले यावेळी उपसरपंच काशीनाथ कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सीईओ स्वामींनी प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसराची पाहणी करून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनसंजीवनी अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सुचना दिल्या.
यावेळी बोलताना सीईओ स्वामी म्हणाले की, आरोग्य कर्मचाऱ्यांवर जनतेबरोबरच आपलेही आरोग्य चांगले राखण्याची जबाबदारी आहे. आपले आरोग्य केंद्र स्वच्छ व सुंदर असेल तर आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचे व तुमचे मन प्रसन्न राहील. प्रसन्न मनाने दिलेली आरोग्य सेवा व घेतलेला उपचार हा निश्चितच परिणामकारक होतो. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गावचे सरपंच व मान्यवर नागरीकांनी देखील या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” अभियानात सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी,नागरीक व कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केल्यामुळे तब्बल सात कोटींपेक्षा जास्त लोकसहभाग गोळा झाला आणि राज्याला दिशादर्शक असे काम आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडले. जनसंजीवनी अभियानात देखील अशाच सहकार्याची अपेक्षा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वसामान्य नागरीकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तेव्हा सर्वांनी याच्या सक्षमीकरणात आपले योगदान द्यावे.
यावेळी सरपंच अविनाश मार्तंडे यांनी या अभियानात ग्रामपंचायतीमार्फत जे काही सहकार्य असेल ते केले जाईल. आजवर आम्ही सहकार्य केले आहे आणि करीत राहू. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझ्याकडे कामाची यादी व खर्चाचे अंदाजपत्रक द्यावे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी प्रल्हाद काशीद यांनी त्यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात “एक कोपरा पक्षांसाठी” ही संकल्पना लक्षात घेऊन कडूलिंब, पिंपळ, वड, आवळा व इतर आयुर्वेदिक महत्व असलेल्या वृक्षांचे रोपण व संवर्धन करण्याची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मंगेडकर, औषध निर्माण अधिकारी केकडे, आरोग्य सहाय्यक अडसूळ, शिंदे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.