ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपला मताधिक्य राखण्याचे तर काँग्रेसला बाजी पलटविण्याचे आव्हान

रिपाई, वंचितची भूमिका महत्त्वाची ठरणार

अक्कलकोट : मारुती बावडे

अक्कलकोट तालुक्यात सध्या लोकसभा निवडणूकीची जोरदार चर्चा आहे.यावेळी मतदार संघातून कोण मताधिक्य घेणार याबाबत आतापासून पैजा लावल्या जात आहेत.ही निवडणूक पुढील विधानसभा निवडणूकीचे वातावरण ठरविणारी असल्याने त्यादृष्टीने कार्यकर्ते जिद्दीने कामाला लागले आहेत.गेल्यावेळी भाजपला ४७ हजारांचे मताधिक्य होते.गेल्या वेळी उमेदवार स्थानिक होता.यावेळी तसे काही चित्र नाही.त्यामुळे भाजपला हे मताधिक्य कायम राखण्याचे तर काँग्रेसला बाजी पलटविण्याचे आव्हान असणार आहे.भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी द्यावी यासाठी मोठा आग्रह धरला होता परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्याने रिपाईत नाराजी निर्माण झाली आहे.ती दूर करण्याचे आव्हान देखील भाजपसमोर राहणार आहे.

गेल्यावेळी अक्कलकोट मतदार संघात भाजपला १ लाख ४ हजार ९१७ ,काँग्रेसला ५७ हजार ४८८ तर वंचितला २७ हजार ६२५ मते मिळाली होती. काँग्रेसने मागच्या आठवड्यापासूनच प्रचार सुरू केला आहे.भाजप आता प्रचार सुरू करण्याची शक्यता आहे.अक्कलकोटमध्ये आमदार प्रणिती शिंदे प्रचारार्थ काँग्रेसने कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा घेतला.त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे काँग्रेसची मरगळ दूर झाल्याची भावना व्यक्त होत आहे.यासाठी ग्रामीण आणि शहरातील कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

या धर्तीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यामध्ये आमदार शिंदे यांनी आता थेट गावोगावी प्रचार देखील सुरू केला आहे.यामध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाचा देखील समावेश होता.यावेळी आमदार शिंदे यांनी भाजपच्या केंद्र व राज्य शासनावर जोरदार टीका केली. सध्याची राजवट ही हुकुमशहासारखी असून मतदार जागा झाला पाहिजे,भाजपच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर देशात भविष्यकाळात निवडणूकाच होणार नाहीत.देश विकत घेतल्यासारखे हे भाजपवाले भारत सरकार न म्हणता मोदी सरकार म्हणतात ही भाषा कोणती आहे.या दहा वर्षात बेरोजगार तरुण वाढले त्यांना नोकऱ्या नाहीत,पिक विमा नाही शेतकरी हा कमकुवत झाला आहे असा उहापोह केला.भाजप सरकार हे फसवे सरकार असून त्याला यावेळी नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. मंजूर केलेले बोरामणी विमानतळ व बी एस एफ सेंटर त्यांना करता येईना,असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. केवळ घोषणा करून कोणताही निधी न आणता कामे मंजूर झाली म्हणायचे हे जनतेला देखील समजले आहे,असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे सांगितले. जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी भाजपच्या सूडबुद्धीचा फर्दाफास केला.बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली या संकल्प मेळाव्याचे आयोजन केले. यामध्ये जिल्हा काँग्रेसचे अशपाक बळोरगी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे ,शहर अध्यक्ष रईस टिनवाला, युवा काँग्रेसचे अध्यक्ष बाबा पाटील, माजी जि प सदस्य मल्लिकार्जुन पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव हे अग्रभागी होते. यावेळी तालुक्यात काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली असून आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपने मेळावा घेऊन उमेदवार कोणी का असेना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. रविवारी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली.

यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे एकच जल्लोष केला.सध्या केंद्रात आणि राज्यात सरकारकडून झालेली विकास कामे आणि खास करून अक्कलकोट मध्ये झालेले हजारो कोटीची विकास कामे या दोन गोष्टी प्रामुख्याने भाजपच्या बाजूने जमेच्या ठरत आहेत.आमदार सचिन कल्याणशेट्टी स्वतः जिल्हाध्यक्ष असल्याने खासदारकीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक पडली आहे. देगाव एक्सप्रेस योजना, अक्कलकोट बस स्थानक, शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, एकरूख उपसा सिंचन योजना,नवीन रस्ते त्याशिवाय अन्य विकास कामांचा प्रचार भाजपकडून जोरदार केला जात आहे.

शिंदे यांनी सोलापूरसाठी काय केले हा प्रश्न भाजपाकडून विचारला जात असून पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत भाजपची सत्ता येणार आहे.त्यामुळे कोणत्याही दिशाभूलीला मतदाराने बळी पडू नये,असे आवाहन मेळाव्यादरम्यान करण्यात आले.भाजप विकासाभिमुख पक्ष आहे काँग्रेसची घडी विस्कटलेली आहे.विकासासाठी भाजपला सक्षम पर्याय नाही त्यामुळे उमेदवार बघू नका, केवळ मोदी यांचा चेहरा पाहून मतदान करण्याची गरज आहे असे देखील भाजपकडून सांगण्यात येत आहे.भाजपमध्ये माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी,आनंद तानवडे हे दोन गट कार्यरत असून ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष राहणार आहे.माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सोबत आहेत अर्थात ते भाजप बरोबरच आहेत. भाजपमध्ये जरी गट-तट असले तरी काँग्रेस मधून काही लोक भाजपमध्ये आलेले आहेत त्यामुळे त्याचाही फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.काँग्रेसमध्ये मात्र सिद्धाराम म्हेत्रे यांचे एकमुखी नेतृत्व आहे. तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे ,महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शितल म्हेत्रे व युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांनी स्वतंत्ररीत्या प्रचाराची आखणी केली आहे.गेल्या वेळी वंचितकडून एड.प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी होती.त्यामुळे दलित व बहुजन समाजाच्या विभागणीचा फटका काँग्रेसला बसला होता.यावेळी मात्र तशी काही परिस्थिती नाही त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काटे की टक्कर दिसेल अशी तरी सध्याची स्थिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!