मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही जिल्ह्यात आज हलक्या आणि मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हमानान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी देखील मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसात पावसाने उघडीत दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. हातात आलेली पिके वाया जाण्याची भीती वर्तवण्यात येत होती. मात्र, आजपासून पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात असून विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.