चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवे;पालकमंत्र्यांकडून बैठक नसल्याने शेतकरी संघर्ष समिती पुन्हा आक्रमक ; पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा
अक्कलकोट, दि.१४ : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड बाबतीत पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन दहा दिवस उलटले तरी बैठक लागली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसात बैठक न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मागच्या पंधरा दिवसांपूर्वी अक्कलकोटसह दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी मोबदला मिळाल्याच्या निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले होते. यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन या कामाला स्थगित देत असल्याचे सांगून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक लावणार असल्याचे जाहीर केले होते. बैठक होऊन आठ ते दहा दिवस झाले तरी अद्याप बैठकीचे निमंत्रण समितीला देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रोज या विषयाबाबत विचारणा होत आहे. प्रशासनाचे कामकाजही सुरूच आहे. हायवे संबंधी विविध कारवाया सुरूच आहेत.त्यामुळे आता संबंधितांनी याबाबतीत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नियोजित चक्काजाम आंदोलन देखील स्थगित करण्यात आले होते आता ते पुन्हा करण्यात येईल त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मोरे यांनी दिली. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना याबाबतीत अंधारात ठेवले जात आहे. निर्णय घेण्यास उशीर करण्यात येत आहे प्रथमदर्शनी शेतकऱ्यांवर अन्याय झालेला असताना सरकार व प्रशासन निर्णय घेण्यास इतका विलंब का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी विश्वनाथ भरमशेट्टी, स्वामीनाथ हरवाळकर, दिपक पवार, मल्लिनाथ म्हेत्रे, कालिदास वळसंगे, भीमाशंकर बनने, सादिक बांगी, केदार माळी आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा
पालकमंत्री शब्द देऊन जर पाळत नसतील तर त्या शब्दाला काही अर्थ उरणार नाही. मग हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे यावरून सिद्ध होते. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव सरकारचा आहे की काय? अशी शंका निर्माण होते. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. सरकारने लवकर निर्णय घ्या. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही – बाळासाहेब मोरे, अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती