सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सभा होणार आहे.
२०१७ साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न सुरू केले असून सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रभागातून १०२ उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरला सभा होणार असल्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या सभेच्या तयारीसाठी भाजपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून सभेचा प्रसार घरोघरी जाऊन केला जात आहे. या सभेला सोलापूरकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.
हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभेसाठी मंडप उभारण्याची तयारी सुरू आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या सभेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले आहे.