ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री फडणवीस संतापले : ‘बापाचा माल आहे का?’

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसापासून अनेक मोठे निर्णय घेत असतांना आता गडचिरोली जिल्ह्यात मुक्कामी राहणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ‘बापाचा माल आहे का?’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना झापले. दुर्गम भागात गट्टी टाकून तयार करण्यात आलेला रस्ता अधिकाऱ्यांनी वन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगत नांगरणीचे ट्रॅक्टर लावून खोदून टाकला होता. या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दाखल घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वास्तविक त्यांच्या शांत स्वभावामुळे ओळखले जातात. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलग्रस्त अति दुर्गम भागात मुक्कामाला राहिले आहेत. यावेळी ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. संबंधित कार्यालयात जाऊन पत्र व्यवहार करा, केवळ त्रुटी काढत बसू नका, असे निर्देश त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभेतच हा सर्व प्रकार झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते.

2019 च्या निवडणुकीदरम्यान देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली येथे मुक्कामी राहिले होते. गडचिरोली पोलिस दलाच्या रेस्ट हाऊस मध्ये त्यांचा मुक्काम असून ते गडचिरोली येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची मोर्चेबांधणी देखील करणार आहेत. पक्षात असलेली अंतर्गत गटबाजी दूर करण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागात निवडणुका शांततेने पार पाडण्यासाठी फडणवीस यांनी जिल्ह्यामध्ये मुक्काम केला असल्याचे बोलले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!