ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्र्यानी शब्द पाळला : परतवारीपूर्वीच वारीतील दिंड्यांना 3 कोटी रुपयांचे वितरण

मुंबई : वृत्तसंस्था

आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना अनुदानापोटी ३ कोटी निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परतवारीपूर्वीच हा निधी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी सोमवारी (दि.29) पत्रकार परिषदेत दिली.

परतवारीपूर्वीच याची पूर्तता झाल्याने लाखो वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे ह.भ.प. अक्षय महाराज भोसले म्हणाले. सोमवारी (दि.29) परतवारीच्या निमित्ताने ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी वारकरी आणि दिंडी प्रमुखांच्या वतीने शासनाचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी यंदाच्या आषाढी वारीतील सुविधांसाठी प्रशासकीय निर्णय घेतेल ते अभूतपूर्व आहेत. त्यामुळेच यंदाचा आषाढी वारी सोहळा वारकऱ्यांच्या दृष्टीने सर्वार्थाने आनंददायी ठरला, असे भोसले महाराज म्हणाले.

मागील ७ दिवसात दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. दिंडींना सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणाच केली नाही तर ते पैसे शासनाकडून लाभार्थ्यांना मिळाले की नाही याचीही शहानिशा केली. ह.भ.प. अक्षय महाराज भोसले पुढे म्हणाले की, वारीच्या तीन दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात स्वत: उपस्थित राहून वारीचे नियोजन केले. वारीत सहभागी लाखो वारकऱ्यांना यंदा पिण्याचे शुद्ध पाणी, फळांचा रस, आरोग्याची वारी, निर्मल वारी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या, अशी माहिती भोसले यांनी दिली. वारीत निधन पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत करत आहे. विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात वारीत सहभागी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाखो फॉर्म वितरित करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली.
यंदा पंढरपुरात १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. १५ लाख १२ हजार ७०० वारकऱ्यांनी आरोग्याच्या वारीचा लाभ घेतला. यात २५८ तात्पुरते आपले दवाखाने, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने १३६ हिरकणी कक्ष कार्यरत होते. निर्मल वारीच्या माध्यमातून वारी मार्गातील गावांमध्ये आठ तासांपेक्षा कमी वेळेत स्वच्छता करण्यात आली. आषाढी एकादशीनंतर एका दिवसात पंढपुरात स्वच्छता करण्यात आल्याचे अक्षय महाराज भोसले म्हणाले. केवळ मुख्यमंत्रीच नाही तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीसुद्धा वाखरी ते पंढरपूर असा वारकऱ्यांसोबत पायी प्रवास केला आणि वारीत सहभाग घेतला.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे वारकरी संप्रदाय खुश आहे. शिवसेना पक्ष म्हणून वारीत वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी वारकरी महामंडळ स्थापन केलं आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत . हे सरकार वारकऱ्यांचे आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे. काहींनी वारकऱ्यांना मदत करण्याचे ढोंग केले. तर काहीजण फोटो सेशनसाठी वारीमध्ये चालले अशी टीका भोसले यांनी विरोधकांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!