ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट : नुकसानीचा सादर केला तपशील !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील सादर केला आणि केंद्र सरकारकडे भरीव मदतीची मागणी केली आहे. सुमारे एक तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे, आता राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदतीची मोठी अपेक्षा आहे.

मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील पिके वाहून गेल्याचे, माती सुद्धा वाहून गेली आहे. तसेच, लेकरांप्रमाणे जपलेली जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये मनुष्यहानीही झाली आहे. शेतकऱ्यांवरील या संकटावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री आज कागदपत्रांची मोठी फाइल घेऊन पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते.

भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री म्हणून आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पत्र दिले आहे. या पत्रात महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची माहिती देऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि भरीव मदत करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी या मागणीवर सकारात्मकता दर्शवली असून, लवकरात लवकर तुमचा मदतीचा प्रस्ताव येऊ द्या, आम्ही त्यावर कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यामुळे आता राज्याच्या मदत प्रस्तावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!