अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपुर्ती सोहळा मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सोलापुर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर विरोध असल्याचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष सतीश बुजूरके, अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, अक्कलकोट शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, तमण्णा घोडके, अभिमन्यू काळे,निलेश लवटे, दाजी कोळेकर, रवी बजंञी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वचनपुर्ती सोहळ्याचा कार्यक्रम सोलापूर येथे मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या वचनपुर्ती सोहळ्यासाठी जिल्ह्यातून ३० हजार महिलांना आणण्यासाठी राज्य सरकारने ४०० बसेसची सोय केलेली आहे. तसेच भोजन व्यवस्था, पाणी, अनुषंगीक व्यवस्था इत्यादी जबाबदारी पुरवठा विभागावर सोपवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागावर पावसाळी परीस्थिती पाहता योग्य मंडप व अनुषंगीक व्यवस्था योग्य पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान हा वचनपुर्ती सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंञणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून कामे करावेत अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. या वचनपुर्ती सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा कडकडीत विरोध आहे. वचनपुर्ती सोहळा घ्यायचाच असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वताच्या पक्षाच्या वतीने खर्च करुन हा वचनपुर्ती सोहळा घ्यावा. जनतेच्या पैशावर उधळपट्टी करुन राज्यावर कर्जाचे डोंगर उभारण्यात येऊ नये. या कार्यक्रमाला वारेमाप खर्च होणार आहे.
त्याऐवजी राज्यातील सरसकट महिलांना लाडकी बहीण योजनेत समावेश करुन त्यांना न्याय मिळवून द्यावा. जर तुम्हाला राज्यातील लाडक्या बहीणीची इतकी काळजी असेल तर राज्यात अनेक बलात्कार, अत्याचार, हिंसा, हत्येची घटना दररोज वाढतच आहे. यावर शासन कठोर निर्णय घेताना दिसून येत नाही. लाडक्या बहीणीला तुमच्या पैशाची गरज नसून तिला सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी. या सरकारवर महिलांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे महिलांना खुश करण्यासाठी अशा योजना आणून राज्यावर कर्जाचा डोंगर उभारण्याचे पाप या शासनाकडून होत आहे त्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर विरोध असल्याचे मत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी केले आहे.