ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयंत पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट नकार

सांगली : वृत्तसंस्था


सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्टपणे पूर्णविराम दिला आहे. काही दिवसांपासून या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते, मात्र आता या चर्चांवर फडणवीसांनी स्पष्ट भाष्य करत या संभावनांना आळा घातला आहे.

मुंबईतील भाजप कार्यालयात अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे आणि विश्वास डांगे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “तुमच्या मनात असलेला सांगलीतील प्रवेश अद्याप तरी झालेला नाही.”

त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “महाराष्ट्रातील जमिनीशी जोडलेले अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अनेकांना पक्षात घेण्याचे काम करत आहेत. मात्र, जयंत पाटील यांच्या संदर्भात सध्या कोणताही प्रवेश झालेला नाही.”

जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये दाखल झाल्याने सांगलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यामुळे जयंत पाटील देखील लवकरच भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, फडणवीस यांच्या स्पष्ट वक्तव्यानंतर त्या चर्चांना काही काळासाठी पूर्णविराम मिळाला आहे.

अण्णासाहेब डांगे हे पूर्वी भाजप, जनसंघ, जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांत सक्रिय होते. आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने सांगलीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर सांगलीतील आगामी राजकीय घडामोडी आणि जयंत पाटील यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!