मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या मोठ्या घटना घडत असतांना नुकतेच ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी एक पत्र पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना लिहिले आहे. त्यानंतर मोठी राज्यात खळबळ उडाली आहे.
मी स्वत: एक लोकप्रतिनिधी असून जनतेमध्ये आम्हाला जावे लागते. या अशा वाढत्या गुन्हेगारीमुळे माझी सुरक्षा धोक्यात आली आहे. माझ्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षा रक्षकही कमी केले आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचे काही झाल्यास त्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार राहतील असे पत्र ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना लिहिले आहे. सोमवारी हे पत्र ठाणे पोलिसांना दिले. ठाण्यातील गुन्हेगारांची परेड घेण्याची मागणी देखील त्यांनी केली.
वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कडक पाऊले उचण्यासाठी सोमवारी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने खासदार विचारे यांच्यासह पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र ते नसल्याने सह पोलिस आयुक्त चव्हाण यांची भेट घेत त्यांच्याकडे मागणी केली आहे.
यावेळी, दिलेल्या निवेदनात ‘सध्या ठाणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. घटनाबाह्य सरकारकडून वाढत्या गुन्हेगारीला चालना मिळते की काय? असे आता वाटायला लागले आहे. जेव्हापासून हे सरकार सत्तेत आले आहे या ठाणे जिल्ह्यात व महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून सूडबुद्धीने कारवाई करणे, कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करून गंभीर गुन्हे दाखल करणे, शाखा बळकावणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे हे प्रमाण वाढले आहे. खास करून मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे शहरात या गोष्टी राजरोसपणे चालू आहेत.’ असेही म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात गुन्ह्यांच्या थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्या. ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असून घटनाबाह्य सरकारकडून गुन्हेगारीला चालना मिळते का असे वाटू लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातही गुन्हे राजेरोसपणे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. त्यानंतर दहिसर येथे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबूक लाईव्ह दरम्यान गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यासह राज्यभरात कुठे ना कुठे असे गुन्हे घडतच असून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते. या मुद्यावरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले. याच मुद्यावरून खासदार राजन विचारे यांनी हे पत्र लिहीले आहे.