ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्र्यांची पंढरपुरात मोटारसायकल सवारी

पंढरपुर : वृत्तसंस्था

आषाढी एकादशी सोहळा दोन दिवसांवर आला असून, रविवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील भक्ती सागर (६५ एकर) परिसर, चंद्रभागा वाळवंट व दर्शन रांगेतील सेवासुविधांची पाहणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोटारसायकलवरून प्रवास करत चंद्रभागा नदीपात्र गाठले. त्या ठिकाणी पाण्यात उतरून स्वच्छता व शासनाकडून देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती घेतली.

आषाढी एकादशी सोहळा बुधवार, १७ जुलै रोजी होत असून, या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून पालखी मार्ग तसेच पंढरपूर शहरात विविध सेवासुविधा पुरवण्यात येत आहेत. ६५ एकर परिसर येथे वीज, पाणी, स्वच्छतागृह आदींसह वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून शहरातील सेवासुविधा, ठिकाणे यांची माहिती देण्यात येत आहे. या एलईडी स्क्रीन, पाणी वाटप केंद्र तसेच आरोग्य केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे, राजू खरे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ६५ एकर येथून मुख्यमंत्री मोटारसायकलवरून चंद्रभागा वाळवंट येथे पोहोचले. त्यांच्या गाडीचे सारथ्य आ. समाधान आवताडे यांनी केले. नदीपात्रातील सुविधांबाबतची माहिती घेत त्या ठिकाणी असणाऱ्या मुलाकडून अष्टगंध व बुक्का कपाळावर लावून घेतला. तसेच नदीपात्रात तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत, त्याविषयीची त्यांनी माहिती घेतली. दर्शन रांगेतील सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच इतर सुविधा याबाबत माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!