सोलापूर : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेद्र फडणवीस हे राज्यातील अनेक जिल्ह्यात ‘लाडकी बहिण’ योजनेच्या कार्यक्रमानिमित्त जात आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होत आहे. मात्र आता २५ सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.
जरांगे पाटील यांचे राज्यातील समर्थक हे राज्य सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील मराठा समाज बांधवानी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत, इशारा दिला आहे. सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होऊ देणार नाही, मराठा समाज मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावणार अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या माऊली पवार यांनी मांडली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे लाडक्या बहीण, लाडक्या भाऊच्या प्रचारासाठी २५ सप्टेंबर रोजी सोलापुरात येणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विविध मागण्यांचं घोंगड भिजत ठेवून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार करत आहेत. मराठा आरक्षणाचा हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट लागू करण्याच निर्णय आजही प्रलंबित ठेवण्यात आला आहे, त्यामुळे सोलापुरात होणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावू, अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापुरात मराठा बांधवांनी दिली आहे.