अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षांची आवड ही लहानपणापासूनच असावी लागते तरच तो पुढे जाऊन एखादा उच्चपदस्थ अधिकारी होऊ शकतो. मंथन परीक्षेच्या माध्यमातून तयारी करून निश्चितच पुढच्या काळात जिल्हा परिषद शाळांची मुले स्पर्धा परीक्षांच्या वाटेवर जातील, असा विश्वास अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी व्यक्त केला.अक्कलकोट तालुक्यात २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अक्कलकोट येथील पंचायत समिती सभागृहात पार पडला.यावेळी गटशिक्षणाधिकारी अरबाळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे, रविराज खापरे,केंद्रप्रमुख सुरेश शटगार,पंचायत समितीचे कक्ष अधिकारी दयानंद परिचारक, आकाशवाणीचे वृत्त निवेदक मारुती बावडे, मंथन समन्वयिका अश्विनी विक्रम जाधव, इस्माईल मुर्डी, श्रीशैल माळी,सैदप्पा कोळी,राजेंद्र सूर्यवंशी ,बसवराज खिलारी, दयानंद चव्हाण उपस्थित होते. पुढे बोलताना अरबाळे म्हणाले की, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था ही खूप चांगली आहे.अनेक शिक्षक गुणवान आहेत.अक्कलकोट तालुक्यातील गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.पालकांनी देखील विश्वासाने जिल्हा परिषद शाळांमध्ये आपली मुले घालावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पत्रकार बावडे म्हणाले, शहरी भागात शिक्षण चांगले आहे आणि ग्रामीण भागात गुणवत्ता नाही अशा प्रकारचा नरेटिव्ह पसरविला जात आहे तो चुकीचा आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी देखील आयएएस अधिकारी झालेले आहेत हे विसरून चालणार नाही.यावेळी खापरे,शटगार यांची मनोगते झाली. सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात अक्कलकोट तालुक्यातून तीन केंद्रात
पहिली ते आठवी वर्गातील एकूण ५३८ विद्यार्थी परीक्षेत बसले होते.
यात संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या यादीमध्ये कु.आयत शेख यांचा तर अक्कलकोट तालुक्यातून ६४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. या सर्व गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन शितल डावरे, सुनील राठोड यांनी केले. प्रास्ताविक तुकाराम जाधव यांनी केले तर आभार राजाराम सुरवसे यांनी मानले.