मुंबई : वृत्तसंस्था
राज्याला हादरविणारी घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात घडली असून या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून मंगळवारी (दि.२०) उद्रेक झाला. संबंधित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पालक आणि आंदोलकांनी शाळा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्यातच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे संतापाचा कडेलोट झालेले पालक आणि आंदोलकांकडून शाळेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी बचावासाठी लाठीचार्ज केला. तसेच अश्रूधुराची नळकांडी फोडण्यात आली. दरम्यान, शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
अत्याचाराच्या या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संस्था, संघटना पदाधिकार्यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. मंगळवारी सकाळी साडेदहापासूनच आंदोलक शाळेसमोर उपस्थित झाले. हजारो बदलापूरकर या आंदोलनात सहभागी झाले होते. साडेदहानंतर आंदोलन इतके आक्रमक झाले की, कुणीही पोलिसांचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. रेल्वे पोलिस आयुक्त स्वतः आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देत रेल्वे स्टेशन परिसर दुमदमून सोडला.