मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अचानक गारठा वाढू लागला असून तापमानात मोठी घसरण होत आहे. विशेषतः पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात किमान तापमान एक अंकी आकड्यापर्यंत खाली गेले आहे. त्यामुळे थंडीसाठी विशेष ओळख नसलेल्या शहरांमध्येही लोकांना सकाळ-संध्याकाळ बोचऱ्या थंडीचा प्रत्यय येऊ लागला आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी चढ-उतार होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट ही देण्यात आला आहे. राज्यभर अचानक वाढलेल्या या थंडीमुळे नागरिक अडचणीत आले असून अनेक भागात रात्री शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे.
पुण्यातील थंडी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वेळी अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील किमान तापमान 9.8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका विशेष जाणवतो. दिवसा ऊन असले तरी हवेतला गारवा कायम असल्याने वातावरणात हिवाळ्याची जाणीव सतत राहते. शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, चिंचवड, मगरपट्टा अशा उपनगरांमध्येही तापमान झपाट्याने घसरताना दिसत आहे. पाषाण येथे 9.8 अंश, तर शिवाजीनगरमध्ये 10.8 अंश तापमान नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांत 10 अंशांच्या आसपास फिरणाऱ्या तापमानाने आता एक अंकी संख्या गाठल्याने पुणेकर थंडीच्या झटक्याने अक्षरशः दचकल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने तापमान आणखी खाली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
नाशिक जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांत तापमानात अचानक मोठी घसरण झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान 6.9 अंशापर्यंत खाली आले असून हा या हंगामातील सर्वात न्यूनांक आहे. मागील 24 तासांत तापमानात तब्बल दोन अंशांनी घट झाल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांनी सकाळी लवकर बाहेर पडताना शेकोट्यांचा आधार घेतला. सोमवारी 8.3 अंश तापमान नोंदवले गेले होते, मात्र मंगळवारी त्यात पुन्हा घट झाली. शेतकरी, मजूर आणि सकाळी लवकर कामाला जाणाऱ्यांसाठी ही थंडी अधिक त्रासदायक ठरत आहे. नाशिकमधील अनेक भागात दव पडत असून शेतीतील कामांवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम स्पष्ट जाणवतो आहे. भंडारा जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून हवामान खात्याने येथे यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांत सतत वाढणाऱ्या थंडीमुळे शहरात आणि ग्रामीण भागात सकाळी-पहाटे शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. थंडी असूनही सकाळी वॉकला जाणाऱ्यांची संख्येत मात्र विशेष फरक पडलेला नाही; मात्र थंडीपासून बचावासाठी लोकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे. हवामान विभागानुसार पुढील काही दिवस मध्य भारतात थंडीची लाट कायम राहणार असून विदर्भातही त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो. नागपूर, वाशिम, यवतमाळ, अमरावती आदी जिल्ह्यांतही पारा 11 अंशांच्या खाली गेला आहे.