अक्कलकोटचे ट्रामा केअर सेंटर २० जूनपर्यंत पूर्ण करून ताब्यात द्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
अक्कलकोट : अक्कलकोट येथे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम येत्या २० जून पर्यंत पूर्ण करून ही इमारत तातडीने आरोग्य विभागाकडे वर्ग करा,असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. ट्रामा केअर सेंटरअभावी अक्कलकोट तालुक्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर आठ दिवसापूर्वी अक्कलकोट नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांनी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत बैठकीचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने २०१७ पासून हे काम ठेकेदाराकडून प्रलंबित असल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली होती. त्यास जबाबदार असणाऱ्यांवर व्यक्तींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यात करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ही बैठक पार पडली.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धोत्रे, जिल्हा शल्यचिकित्सक ढेले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता थोन्टे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी आता २३ दिवसाची मुदत बांधकाम विभागाला देण्यात आली आहे. या तेवीस दिवसात इमारतीचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. अशा कडक सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आरोग्य विभागाकडे इमारत हस्तांतरित करा व एक जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत हे ट्रामा केअर सेंटर सुरू झाले पाहिजे, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.
दरम्यान जिल्हाशैल्य चिकित्सक यांनी देखील या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासनाकडे तातडीने नोकरभरती व इतर यंत्रसामग्री बाबतचा प्रस्ताव आजच तयार करून तो शासनाकडे पाठवावा आणि त्याची प्रत संबंधित विभागाला द्यावी तसेच तक्रारदाराला देखील द्यावी, अशी सूचना या बैठकीमध्ये करण्यात आली. या बैठकीमध्ये काम २०१५ – १६ ला काम
मंजूर असताना इतका विलंब का झाला यावरती चर्चा झाली. त्यानंतर या कामाला २० जूनपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. तशा प्रकारची लेखी हमी घेण्यात आली आहे, असे नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून प्रस्ताव वरिष्ठांकडे गेल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावणार असल्याचे बळोरगी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.