अकोला : वृत्तसंस्था
देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असून महाविकास आघाडी ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यास अयशस्वी ठरले आहेत. वंचितकडून अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तरीही दुसरीकडे काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील होण्याची विनंती केली जात आहे. ‘आम्ही दोस्तीचा हात पुढे केलाय, काँग्रेस दोन जागा देण्यास तयार, अशी ऑफर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर मोठं वक्तव्य केलं. ‘काल अकोल्यात जाऊन बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा विनंती केली. आम्ही दोस्तीचा हात हात पुढे केला आङे. काँग्रेस दोन जागा देण्यास तयार आहे. आमचा प्रस्ताव ते मान्य करतील, अशी आमची आशा आहे. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. त्यांचा प्रस्ताव अजून आलेला नाही, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेवरील तिढ्याबाबत नाना पटोले म्हणाले, ‘सांगलीचा विषय हायकमांडकडे पाठवला आहे. आघाडी असताना शिवसेनेने असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. विशाल पाटील यांच्या पुनर्वसनाचा हा प्रश्न नाही. सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी फायनल झाली होती. हा तिढा लवकरच सुटेल, असेही नाना पटोले म्हणाले.