सोलापूर दि.११ : काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडी टिकणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरता पक्ष आहे तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर नसल्याचं माळी यांनी म्हटलं आहे.
आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची होणारी घुसमट आणि सापत्न वागणुकीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांची भूमिका पटवून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढविण्यास पक्षश्रेष्ठींकडून होकार आल्याचा दावा माळी यांनी केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. मात्र काँग्रेसच्या वाट्याला आलेली मंत्रिपदं आणि मिळणारा निधी हा राष्ट्रवादी-शिवसेनेला मिळणाऱ्या निधीपेक्षा खूपच कमी असल्याचं भानुदास माळी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे. या सर्वांमुळे आगामी काळातील निवडणुकांत कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं भानुदास माळी म्हणाले.