ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेस नेते पटोलेंनी दिला कार्यकर्त्यांना दम : इथे व्यक्ती नाही, तर पक्ष मोठा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी भंडाऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार भाषण करत कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला. काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे. इथे व्यक्ती नाही, तर पक्ष मोठा आहे. जातीपातीच्या आधारावर निवडणूक लढवली, गटबाजी केली, तर आपला राजकीय नाश निश्चित आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सजग राहण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर जो कोणी पक्षातील कार्यकर्त्याला धमकावेल, त्याच्या घरात घुसून उत्तर दिलं जाईल, अशा कठोर शब्दांत त्यांनी स्पष्ट संदेश दिला.

मेळाव्यात पटोले म्हणाले की, कालपर्यंत जे झालं ते विसरून जा, उद्या नव्या जोमाने कामाला लागा. पक्षातील शिस्त पाळणं हीच खरी निष्ठा आहे. कार्यकर्त्यांमध्ये एकी नसेल तर विरोधकांना संधी मिळेल. त्यांनी हेही सांगितले की, पक्षाकडून उमेदवारी कोणाला द्यायची हे सर्वेक्षण आणि स्थानिक मतांच्या आधारे ठरेल. आपल्याला उमेदवारी हवीच असा हट्ट ठेवू नका, पक्षाचं धोरण महत्त्वाचं आहे. कुणी कुणाला धमकावलं किंवा दडपण आणलं तर मी वैयक्तिक पातळीवर कारवाई करेन, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

नाना पटोले यांनी आपल्या भाषणात भाजपवरही जोरदार टीका केली. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याचं स्वप्न पाहिलं, पण आज चित्र उलटं आहे. काँग्रेसमधील काही लोक भाजपमध्ये गेले आणि आता भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे. अनेक आले आणि अनेक गेले, पण काँग्रेस पक्ष आजही ठाम उभा आहे. महाराष्ट्रातील जनता आजही काँग्रेसच्या विचारांवर विश्वास ठेवते, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा तिरंगा भंडारा नगरपालिकेवर पुन्हा फडकणारच. कारण जनतेच्या मनात अजूनही काँग्रेसची ओळख कायम आहे.

यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पटोले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, आपल्या मतदारसंघात जाती, धर्म किंवा गट या आधारावर मतांची बेरीज-जोड होऊ देऊ नका. समाजाला जोडणं ही काँग्रेसची परंपरा आहे. आपण जर विभागलो तर शत्रूला जिंकणं सोपं जाईल. त्यांनी हेही नमूद केलं की, जे लोक पक्षापेक्षा स्वतःला मोठं समजतात, त्यांना काँग्रेसमध्ये स्थान नाही. काँग्रेस हा संघर्षातून उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने संघर्षाची तयारी ठेवावी.

मेळाव्यात शेवटी पटोले यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं की, निवडणुका म्हणजे केवळ मतं मागण्याचं नव्हे, तर जनतेचा विश्वास जिंकण्याचं माध्यम आहे. आपल्या कामगिरीवर आणि स्वच्छ प्रतिमेवर जनता विश्वास ठेवते. त्यामुळे आपला प्रत्येक पाऊल लोकांसाठी असावा. त्यांनी भंडाऱ्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलं. भंडाऱ्यात काँग्रेसचा तिरंगा पुन्हा फडकवला नाही, तोवर आपण थांबणार नाही, अशा निर्धारपूर्ण शब्दांनी नाना पटोले यांनी कार्यकर्ता मेळाव्याचा समारोप केला. आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभी राहण्यासाठी सर्व कार्यकर्ते आता सज्ज झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!