मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये, म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत. असे नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोले यांनी सार्वजनिक रित्या करत असलेल्या वक्तव्यांवर काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना काही प्रश्न विचारला आहे. स्वबळावर लढायचं असेल तर स्पष्ट सांगा, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सवाल विचारल्याची सांगण्यात आले आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी राष्ट्रवादीने भूमिका मांडली आहे. एकटं लढायचं ठरवले असल्यास स्पष्ट सांगा, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल केला आहे.
यावर नाना पटोले यांनी आज स्पष्टीकरण दिली आहे. मला माझ्या पक्षाचं काम करायचं आहे. माझ्या पक्षाचं काम करताना कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही, असेही नाना पटोले म्हणाले. इतकंच नाही तर 2024 मध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष असेल अशी प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी उद्भवलेल्या वादानंतर दिली आहे.