मुंबई: कॉंग्रेसमध्ये असतांनाही कॉंग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणारे माजी खासदार माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पुन्हा एकदा मोठी संधी देण्यात आली आहे. निरुपम यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीत व संसदीय मंडळावर आणखी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणूगोपाल यांनी त्यांची निवड केली आहे. संजय निरुपम यांच्यासह माजी खासदार एकनाथ गायकवाड व माजी आमदार जनार्दन चांदुरकर यांचीही संसदीय बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे तिघेही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. नाना गावडे, सचिन नाईक, संजय राठोड व चारुलता टोकस यांना कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
संजय निरुपम हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्याविरोधात पक्षातून अनेक तक्रारी होत्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस सहभागी असल्याने त्यांनी टीका देखील केली होती. शिवसेनेसोबत काँग्रेसने सरकार स्थापन करण्यास निरुपम यांचा विरोध होता. त्याबद्दलची नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती.