भाजपच्या चुकीच्या अपप्रचाराला काँग्रेस कार्यकर्ते बळी पडले : शिंदे
अक्कलकोट येथे महाविकास आघाडीचा संकल्प मेळावा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गेल्या वेळी माझ्याबद्दल आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याबद्दल चुकीचा दिशाभूल करणारा प्रचार भाजपने केला.या चुकीच्या अपप्रचाराला आमचे कार्यकर्ते बळी पडले.ही चूक यावेळी सुधारा, ती चूक पुन्हा करू नका,असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात बोलताना केले.सोमवारी,लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिनवाला फंक्शन हॉल येथे महाविकास आघाडीच्यावतीने संकल्प सभा पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, अश्पाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील,प्रथमेश म्हेत्रे, शिवसेनेचे आनंद बुक्कानूरे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा,मलगोंडा, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष शितल म्हेत्रे, शहराध्यक्ष रईस टिनवाला, सद्दाम शेरीकर,बाबा पाटील मल्लिनाथ भासगी, मल्लिकार्जुन काटगाव, धनेश अचलारे, सिद्धार्थ गायकवाड, अरुण जाधव, लाला राठोड,राम जाधव,बंदेनवाज कोरबू,माया जाधव, सुरेखा पाटील, सुनीता हडलगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी मंत्री शिंदे म्हणाले की,भाजपवाले नेहमी चुकीचा प्रचार करण्यात आघाडीवर राहिले आहेत त्यांना खोटे बोलून मते मिळवण्याची सवय झालेली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मतदारांनी देखील जागरूक राहून मतदान करण्याची गरज आहे.आमदार शिंदे म्हणाल्या,सध्या केंद्रातील सरकारमुळे देशाला वाईट दिवस आले असून हुकूमशाहीला जनता अक्षरशः कंटाळली आहे ही हुकूमशाही जर मोडून काढायची असेल तर जनतेने जागरूक होऊन मतदान करून काँग्रेसला निवडून द्यावे.
सध्या देशात काँग्रेससाठी करेंगे या मरेंगे अशी स्थिती निर्माण झाली आहे. जनतेने जर यावेळी नाही ऐकले तर काँग्रेससाठी ही शेवटची निवडणूक असणार आहे इतकी दहशतवाद विरोधी पक्षाने निर्माण केली आहे.ही प्रक्रिया लोकशाहीला घातक आहे. यावेळी मी उमेदवार नाहीच.तुम्ही सगळे उमेदवार आहात असे समजून काम करा. आज देशात अन्याय अत्याचार वाढत असताना कुठलेही खासदार अथवा आमदार सभागृहात बोलायला तयार नाहीत पण मी मात्र त्यांच्या विरुद्ध बोलायचे सोडणार नाही.कारण मला ईडी ,इन कम टॅक्स वाल्यांची कसलीही भीती नाही.मी कधीही चुकीचे बोलत नाही पण उगीच विरोध पण करत नाही. पंतप्रधान मोदी यांनी १५ लाख खात्यात जमा करतो म्हणाले, लाखो लोकांना रोजगार देतो म्हणाले ते दिले का असा प्रश्न विचारून ते फक्त अदानी आणि अंबानीसाठी देश चालवत आहेत,असा हल्लाबोल आमदार शिंदे यांनी केला.या सभेत जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी देशात सध्या भाजपने निर्माण केलेली स्थिती उपस्थितांना सांगून परिवर्तनाशिवाय पर्याय नाही,अशी स्थिती कायम राहिल्यास देशात अराजकता माजेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांपूर्वी अच्छे दिनची घोषणा केली होती
परंतु त्याऐवजी आता जनतेला लुच्चे दिन आलेले आहेत.देशावर कोट्यावधी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करून विकासाचे गाजर दाखविले जात आहे.जाती-जातीमध्ये भांडणे लावली जात आहेत.दोन समाजामध्ये थेट गट निर्माण केले जात आहेत अशा परिस्थितीमध्ये पूर्वीचे सर्वसमावेशक दिवस जर आपल्याला आणायचे असतील तर भाजपची सत्ता घालवल्याशिवाय पर्याय नाही.यावेळी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,बळोरगी,बुक्कानुरे आदींची भाषणे झाली.या संकल्प मेळाव्याला अक्कलकोट शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूलथापांना बळी पडू नका
भाजपवाले देगाव एक्सप्रेससाठी चारशे कोटी रुपये दिले असे सांगत आहेत पण प्रत्यक्षात एक दमडाही त्यांनी दिलेला नाही त्याला अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते हे अजून त्यांना माहिती नाही.तरच निधी मिळतो नुसत्या घोषणा करून काही होणार नाही.अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. – सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री
चिमणी पाडून शेतकऱ्यांना वेठीस धरले
जणू काही आज चिमणी पाडली आणि उद्या विमान येणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून विनाकारण श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली गेली.यातही राजकारण करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम या सरकारने केले.याला स्थानिक लोकप्रतिनिधी देखील तितकेच जबाबदार आहेत,अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.