कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गोपाळपूर येथे भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम वेगात
10 विश्रांती कक्ष उभारण्याचे नियोजन, यात्रेसाठी दर्शनरांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात
पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गोपाळपूर येथे 10 पत्राशेड उभारण्यात आली असून यंदा प्रथमच दर्शन रांगेत 10 ठिकाणी भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम सुरु आहे. दर्शन रांगेत दमलेल्या वृद्ध भाविकांना येथे रांगेतून येऊन विश्रांती घेता येणार असून येथे त्यांना चहा पाणी, वैद्यकीय उपचार याची व्यवस्था केली जाणार आहे. वृद्ध भाविकांना त्रास जाणवू लागताच तातडीने या विश्रांती कक्षात आणून त्यांना वैद्यकीय उपचार दिले जातील . अशा भाविकांना विश्रांती कक्षात येताना टोकन देण्यात येणार असून पुन्हा त्यांना त्यांच्या जागी दर्शन रांगेत जात येणार आहे. एकंदर यंदा कार्तिकी यात्रा विक्रमी भरण्याचा अंदाज असून त्यासाठी प्रशासनाने दर्शन व्यवस्थेवर भर देताना कोठेही घुसखोरी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे .
कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर समितीने गोपाळपूर येथे 10 पात्र शेड उभारले असून दर्शन रांग सात किलोमीटर पर्यंत उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविक हजारोच्या संख्येने दर्शन रांगेत उभे असतात. यावेळी या भाविकांना दर्शन रांगेत निवारा मिळावा, पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार अद्ययावत अशी दर्शन रांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .
कार्तिकी एकादशी ही 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दर्शन रांगेत दोन खांबामधील अंतर जास्त असल्याने हे अंतर कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर मध्ये येत असतात , यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे .