मुंबई : वृत्तसंस्था
अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम सुरूच आहे. शुक्रवारी सोन्याचे भाव वाढून ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. पाच दिवसांत सोन्यात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचेही भाव शुक्रवारी ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोने ६२ ते ६३ हजारांदरम्यान होते; मात्र मार्चच्या सुरुवातीला सोन्यात भाववाढ सुरू झाली. त्यामुळे ५ मार्च रोजी सोने ६४ हजार ६५० रुपयांवर पोहोचले. ६ रोजी ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळा झालेल्या सोन्याने ७ रोजी ६५ हजारांचा पल्ला ओलांडला व ते ६५ हजार ४०० रुपये प्रतितोळा झाले. शुक्रवारी त्यात पुन्हा ३०० रुपयांची वाढ होऊन ते ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा झाले.