अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सोलापुरातील प्रख्यात मेंदू विकार तज्ञ स्व.डॉ.आनंद मुदकण्णा यांचे वैद्यकीय सेवेतील योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात मोठी उणीव भासणार आहे.शेवटपर्यंत डॉ.मुदकण्णा हे रुग्णसेवेसाठी समर्पित
राहिले.त्यांच्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, अशा शब्दात त्यांच्याविषयीच्या आठवणींना अक्कलकोटवासियांनी उजाळा दिला. रविवारी,डॉ.मुदकण्णा यांच्या निधनानिमित्त येथील सर्जेराव जाधव सभागृहात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी शोकसभेचे आयोजन केले होते.
प्रारंभी डॉ. मुदकण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या सभेचे प्रास्ताविक दिलीप सिद्धे यांनी केले.सोलापुरात अनेक चांगले डॉक्टर आहेत म्हणून शहराचे नाव पुढे जात आहे.खरे तर डॉक्टर हे आपल्यासाठी देव असतात.अनेक रुग्णांचे प्राण त्यांच्यामुळे वाचत असतात. त्यापैकीच डॉ.मुदकण्णा हे मेंदू विकारातील अतिशय प्रसिद्ध असे नाव.त्यांचा आणि माझा संबंध गेल्या पंधरा वर्षापासून होता.वैद्यकीय
क्षेत्रामध्ये त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावून अल्पावधीतच यश मिळवले होते. मरावे परी कीर्तिरूपे उरावे या उक्तीला पुरेपूर असे जीवन ते जगले, असे त्यांनी सांगितले. डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.प्रदीप घिवारे यांनी त्यांना आलेले अनुभव सांगत सोलापूरची वैद्यकीय क्षेत्राची उंची त्यांनी कशी वाढविली व त्यांच्या प्रयत्नातून अनेक रुग्ण कसे बरे झाले,हे सांगितले.प्रा.प्रकाश सुरवसे यांनी डॉ.मुदकण्णा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. डॉक्टर जरी मूळचे मुरूमचे असले तरी ते कधीही सोलापूरकरांना परके वाटले नाहीत अशी सेवा त्यांनी बजावली.
पत्रकार मारुती बावडे यांनी सोलापूरला मेडिकल हब बनवण्याचे स्वप्न बाळगणारे ख्यातनाम डॉक्टर अल्पवयामध्ये जाणे ही सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राची खूप मोठी हानी आहे.त्यांची उणीव भासत राहील,अशा भावना व्यक्त केल्या. शिवशरण खुबा यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या.फत्तेसिंह शिक्षण संस्था ,सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने माणिक बिराजदार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सभेचे सूत्रसंचालन बाबा निंबाळकर यांनी केले.यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,फत्तेसिंह संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव,डॉ.अनिल बोरगावकर,सुरेश सूर्यवंशी, प्रमोद मजगे,विक्रम पडवळकर, आदित्य कोतवाल,ए.एम.शेख, प्रदीप बिराजदार, एच.एस.पाटील,पंडित पाटील,एच.एस मुजावर, उमेश कापसे, शिवानंद नंदर्गी,मनोज काटगाव, संजीव चनशेट्टी,सुधाकर गोंडाळ,मोहन चव्हाण, अरुण भुजंगे, इस्माईल मुर्डी,राजू इंगळे आदींची उपस्थिती होती.