मालेगाव : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला होता आता पुन्हा एकदा औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, असे वादग्रस्त विधान मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा औरंगजेब या विषयावरून गदारोळ उठण्याची शक्यता आहे. मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिरात आसिफ शेख यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलताना आसिफ शेख म्हणाले, औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले. ते सर्वधर्म समभाव ठेवणारे आणि तसेच वागणारे होते. मात्र केवळ राजकारणासाठी त्यांना बदनाम केले जात आहे. आज त्यांच्या नावावर मतदान मिळवण्याचे आणि समाजात ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हे योग्य नसल्याचे आसिफ शेख म्हणाले.
त्यांनी केलेल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत पुढे आसिफ शेख म्हणाले, जे आहे ते आहे, आम्ही संविधानाला मानणारे आहोत आणि या देशावर प्रेम करणारे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु आता त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.