मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये गेल्या दोन दिवसापासून नाशिक, रायगड पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे शिंदेसेनेचे दादा भुसे व भरत गोगावले यांचा दावा फेटाळत भाजपचे गिरीश महाजन व राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे भुसे व गोगावलेंनी इतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यासही नकार दिला होता. रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांनी भाजपविरोधात आंदोलनही केले. वाद टोकाला पोहोचल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे दरे या गावी निघून गेले.
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी सरकारने या दोन्ही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत नाशिक व रायगड या दोन्ही जिल्ह्यांत २६ जानेवारीचे झेंडावंदन मात्र महाजन व तटकरे यांच्याच हस्ते होईल, असा आदेश मित्रपक्षाच्या नाकावर टिच्चून काढण्यात आला.
आधी मुख्यमंत्रिपद, नंतर गृह खाते नाकारल्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे यांना भाजपकडून हा तिसरा झटका मानला जातो. शिंदे सरकारमध्ये रायगडचे पालकमंत्रिपद तटकरेंकडेच होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गोगावलेंचा दावा मान्य केला नाही. पण नाशिकचे पालकमंत्री तर दादा भुसे होते, तरीही महाजनांना संधी दिल्याने नाराज झालेले शिंदे दरे (जि. सातारा) या मूळ गावी निघून गेले होते. त्यामुळे सरकारने दोन्ही पालकमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती दिली. शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेते दरेला जाणार असल्याची चर्चा हाेती. पण सोमवारी सायंकाळी शिंदे ठाण्यात परत आले आहेत.