ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीत वाद ? सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांचा दावा !

सोलापूर :  वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केला आहे. यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षात वाद होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्हा हा पूर्वीपासूनच शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 जागा असून गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोहोळ आणि माढा या दोन्ही ठिकाणी आमदार निवडून आले होते. मात्र हे दोन्ही आमदार राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. मात्र आता शरद पवार गटाने माढा, मोहोळ, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. यामुळे कॉंग्रेस आणि शिवसेनेत चिंता निर्माण झाली आहे.
काँग्रेसने यावेळी अक्कलकोट, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर व पंढरपूर, मंगळवेढा अशा पाच जागांवर दावा केला आहे. मात्र पवार गटाने पंढरपूर मंगळवेढा व दक्षिण सोलापूर या दोन जागांवर हक्क सांगितल्याने काँग्रेसच्या वाट्याला केवळ तीन जागा उरत आहेत.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून केवळ सांगोल्यातील एकमेव आमदार विजयी झाला होता. सांगोल्यात जिंकलेले आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदेंची साथ देत उद्धव ठाकरेंना सोडचिट्टी दिली होती. आता उद्धव ठाकरेंनी सांगोल्याची जागा मागितली असून त्यांच्या वाट्याला फक्त बार्शी ही एकमेव जागा येत होती. दरम्यान, सध्याचे चित्र पाहता सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 जागांपैकी शरद पवार गटाने सर्वाधिक सहा जागांवर हक्क सांगितला आहे. यामुळे काँग्रेसकडे तीन आणि शिवसेनेला दोन जागा मिळू शकणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अंतर्गत वाद फुटण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!