ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर : उमेदवारासमोर कार्यकर्ते भिडले

अहमदनगर : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणूकीसाठी आता उमेदवारांनी मतदार संघात गाठीभेटी सुरु झाल्या असून अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोरच शिवसैनिक भिडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. शिवसैनिकांनी यावेळी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब वाकचौरेंच्या शिवसेना प्रवेशामुळे संगमनेरचे शिवसैनिक आधीच नाराज होते. त्यांची ही खदखद या कार्यक्रमात बाहेर आली.

2014 साली शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेशानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेक शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. त्याचाच राग शिवसैनिकांमध्ये आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना याच नाराजीचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांना बोलावलं होतं. त्यानुसार अनेक कार्यकर्ते एकत्र आले होते. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी जुने वाद उकरून काढले. त्यावरुन दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी वाद वाढू नये यासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांनी मध्यस्थी करत गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद यानिमित्ताने बाहेर आले. पक्षातील या मतभेदांमुळे वाकचौरे यांना ही निवडणूक जड जाणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!