कोरोना विरुध्द्च्या निर्णायक लढ्यात प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री भरणे ; येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे
सोलापूर, दि. २५ :- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन कोरोना विरुध्दच्या निर्णायक लढ्यात प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीं आज केले.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रसाराला अटकाव करण्यासाठी प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग काम करीत आहेत. येत्या पंधरा दिवसांत कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याचे अंदाज वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांचा अवलंब केल्यास कोरोना प्रसाराला आळा घालू शकतो, असे श्री. भरणे यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार होत असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करुन श्री. भरणे म्हणाले की, आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोर पालक करावे. जिल्हा प्रशासनाने टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा आधारे कोरोना तपासणी व्यापक प्रमाणावर केली आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही प्रकारची शंका आल्यास तत्काळ स्वत:ची तपासणी करुन घ्यावी आणि तत्काळ उपचार करुन घ्यावेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने दवाखान्यांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधीही देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात लसीकरणाची मोहिम सुरु आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन केले जात आहे. शहर आणि जिल्ह्यातील काही खासगी दवाखान्यातूनही लस देण्याचे नियोजन केले जात आहे. लस पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी याबाबत कसलीही शंका मनात ठेवू नये, असे आवाहनही भरणे यांनी केले आहे.