ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी चाळीस हजार नव्या रुग्णांची नोंद

शांघाय : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून रविवारी एकाच दिवशी ४० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शी जिनपिंग सरकारने झीरो कोविड धोरण अवलंबत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांनी शांघाय शहरासह ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या विरोधात उठाव करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शांघाय शहरात रविवारी सकाळपासूनच नागरिक रस्त्यावर उतरत सरकार विरोधात निदर्शने करत आहेत.

चीनमध्ये कोरोना सातत्याने वाढत आहे. २७ नोव्हेंबर रोजी कोरोनाचे ४० हजार रुग्ण आढळले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. आता चीनमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. यामुळे शी जिनपिंग सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. कडक लॉकडाऊनमुळे ६६ लाख लोक घरात कैद आहेत. हे लोक खाद्यपदार्थांसाठीही घराबाहेर जाऊ शकत नाहीत. रोजच्या कोविड चाचणीमुळेही नाराजी वाढत आहे. शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

बीजिंगपासून सुरू झालेली ही निदर्शने आता नऊ प्रमुख शहरांमध्ये पोहोचली आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिस लाठीचार्ज करून लोकांना अटक करत आहेत, मात्र लोकांचा रोष संपलेला नाही. रविवारी रात्रभर लोकांनी रस्त्यावर निदर्शने सुरूच ठेवली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!