सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरल असलं तरी धोका मात्र कायम आहे. यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आसपासच्या गावात 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत संचार बंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण पोलिसांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दाखल केला होता. आषाढी एकादशी 20 जुलै मंगळवार रोजी श्री. विठ्ठल-रुक्मिणीचे शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते पहाटे अडीच ते साडेतीन वाजता होणार आहे.
दरम्यान आषाढी वारीस दर वर्षी होणारी गर्दी लक्षात घेता आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात शनिवार 17 जुलै 2021 रोजी दुपारी 02 वाजल्यापासून रविवार 25 जुलै 2021 सायंकाळी 04 वाजेपर्यंत पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये भटुंबरे चिंचोली, भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरडोण, कौठाळी या गावांचा समावेश आहे. तसेच दहा मानाच्या पालख्या 19 जुलै रोजी वाखरी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
वाखरी ते इसबावी विसावा असे साधारण तीन किलोमीटर अंतर 400 वारकरी चालत पार करणार आहेत. तर इसबावी ते विठ्ठल मंदिर हे साडेतीन किलोमीटर अंतर प्रत्येक पालखीचे 2 वारकरी असे वीस वारकरी पायी वारी करणार आहेत.