ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दादांची थेट गृहमंत्री शहांकडे ‘मुख्यमंत्री’ पदाची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरु असतांना नुकतेच भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजासह विविध गणपती मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. यात अमित शहा यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील घेतली. जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची देखील बैठक झाली. त्यातच अजित पवार हे अमित शहा यांच्या दौऱ्यात कुठेही दिसले नसल्याने याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, ऐनवेळी अजित पवार आणि अमित शहा यांची विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री पदाची मागणी केली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने 288 मतदारसंघांपैकी 150 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातील कमीत कमी 125 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती आहे. तर अजित पवार आणि अमित शहा यांची मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत 40 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. या सर्व 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने यातील एकही जागा आम्ही सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. याशिवाय काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या महाविकास आघाडीतील दहा ते बारा जागा देखील अजित पवार गटाने मागितल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!