सोलापूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी राजकीय पक्षांना धक्का बसले असतांना नुकतेच सोलापूर येथील मोहोळ तालुक्यातील अजित पवारांच्या गटात फूट पडत असल्याचे दिसते आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात पुन्हा वाद पेटला असल्याचे समोर आले आहे. उमेश पाटील यांनी थेट ‘दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नाही’, अशी घोषणाच दिली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर अजित पवार सध्या आहेत. मोहोळ येथे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र मोहोळ अपर तहसील कार्यालयाच्या मुद्यावर मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून रविवारी मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे. यात अजित पवारांचे विश्वासू समजले जाणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील या बंदला पाठिंबा दिला आहे.
यावेळी उमेश पाटील यांनी ‘दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नाही’ असा नारा देत या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. हा बंद राजकीय भूमिकेतून नसून लोकांच्या मागणीसाठी असल्याचे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावात नव्याने अपर तहसील कार्यालय सुरू झाले आहे. मोहोळ येथील विविध पक्षांच्या नेत्यांचा अनगर येथे कार्यालय होण्यास विरोध आहे. अनगर येथे कार्यालय होऊ नये यासाठी या पूर्वी देखील आंदोलन झाले आहेत. मात्र तरी येथे तहसील कार्यालय सुरू झाले आहे. अनगर येथे कार्यालयाला विरोध असूनही अखेर तिथेच तहसील कार्यालय बनवण्यात आल्याने याचा विरोध दर्शवण्यासाठी रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त हे बंद पुकारून हा निषेध मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीकडून केला जाणार आहे.