ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दादांचे टेन्शन वाढणार ; १९ मतदार संघात होवू शकते बंडखोरी

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली असून महायुतीमध्ये जागावाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना मोठी कसरत करावी लागेल. मात्र, तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दादांसमोर मोठे चॅलेंज असणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचे आव्हान देखील दादांसमोर असेल. महायुतीतील जागावाटप झाल्यानंतर तब्बल 19 मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 19 विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामध्ये, सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या, काही मंत्र्यांच्या मतदारसंघातही बंडखोरीची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मंत्री हसन मुश्रीफ, आमदार नरहरी झिरवळ, आमदार सुनील शेळकर, सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता आहे. निफाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान अजित पवार गटाचे दिलीप बनकर विरुद्ध भाजपचे यतीन कदम यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ, दिंडोरी, कागल, इंदापूर, वडगाव शेरी, आष्टी, कोपरगाव, अहेरी, अकोले, पूसद, जुन्नर, वाई या मतदार संघात महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. महायुतीमधील अनेक नेते हे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. कारण, जागावाटपात भाजपचे पारडे जड असून अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. या बंडखोरीच्या शक्यतेमुळे महायुतीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!