नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार यांचे टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. तर अजित पवारांना दोन मंत्र्यांमुळे संकटात देखील आले आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड हा माजी कृषीमंत्री मुंडे यांच्या जवळचा असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. मुंडे अडचणीत असतानाच विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे देखील न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेमुळे अडचणीत सापडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे दोन मंत्री सध्या अडचणीत सापडले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न करताच निविदा काढल्याचा आरोप करत सर्व पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दाखवत मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. तर आता राष्ट्रवादीचे दुसरे नेते, विद्यमान कृषीमंत्री कोकाटे यांचे मंत्रीपद व आमदारकी धोक्यात सापडली आहे.
कोकाटे यांनी आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. गुरूवारी (दि.20) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सन 1995-96 या काळात कोकाटेंनी सदर सदानिका घेतल्या होत्या. याबाबत 1997-98 या काळात माजीमंत्री स्व. तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती. ज्यावेळी सदानिका घेतल्या त्यावेळी ते जिल्हा परिषदेत कृषी सभापतीपदाची जबाबदारी सांभाळत होते.
1999 च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघातून कोकाटेंनी स्व. दिघोळे यांचा पराभव करत विधानसभा जिंकली. कोकाटे कृषी सभापती असताना झालेल्या तक्रारींवर तब्बल 29 वर्षांनंतर निकाल लागला आहे.