ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद;प्रशासनाच्या आदेशान्वये मंदीर बंद करण्याचा समितीचा निर्णय

अक्कलकोट – राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदीर आज पुन्हा एकदा बंद करण्यात आले. कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदीरात गर्दी होवू नये याकरिता आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदीर समितीस प्राप्त झाल्यानंतर दि.५ एप्रिल २०२१ रात्री ८ ते दि.३० एप्रिल २०२१ अखेर रात्री १२ वाजेपर्यंत वटवृक्ष मंदीर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद ठेवणेबाबत मंदीर समितीच्यावतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहीती समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.

दरम्यान मंदिरातील नियमित धार्मिक विधी, पूजा, आरती इत्यादी धार्मिक उपक्रम नियमित पार पडणार असून  भाविकांना पुर्णपणे दर्शन बंद करण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर बुधवार दिनांक १४ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांचे प्रकटदिन असून सालाबादप्रमाणे प्रकटदिनानिमित्त होणारे धार्मिक उपक्रम हे मंदिरातच समितीचे पुजारी व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत कोणत्याही भाविकांचा त्यात सहभाग राहणार नाही.

वटवृक्ष मंदिरात रोज स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. यामध्ये मुंबई पुण्यासह, नगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर इत्यादी भागातून येणाऱ्या भाविकांची  संख्या लक्षणीय असते.  त्याच प्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यासह शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच देश विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या सगळ्या गोष्टी  लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मंदिर समितीने वटवृक्ष मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तरी पुढील आदेश येईपर्यंत भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटी येण्याचे टाळावे व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच राहून स्वामी समर्थांची आराधना करावी असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!