सोलापूर – जीवनातल्या सात्त्विकतेचा शोध घेणाऱ्या दत्ता हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित केले असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. राजसत्ता ही ज्ञानसत्तेच्या सोबत असण्याचा काळ बदलत चालला आहे. आता राजसत्ता ही धर्मसत्तेकडे झूकत चालली आहे. या काळात खऱ्या अर्थाने कवीचे सृजन समाजाला दिलासा देऊ शकते. कारण कविता ही सार्वभौम असते. समाज याच पध्दतीच्या कविता लिहीणाऱ्या सत्वशील कवींच्या शोधात असल्याचे अभ्यासपूर्ण मत व्यक्त करताना प्रा.जोशी म्हणाले.
जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या प्रा. ए. डी. जोशी सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा व प्रिसिजन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य राज्यस्तरीय पूरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी प्रा. जोशी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रा. जोशी यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, मसाप शाखेच्या कार्यध्यक्षा डॉ. सायली जोशी, पुरस्कारमुर्ती सुनील शिनखेडे, मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी स्नेहा शिनखेडे उपस्थित होते .
प्रा. जोशी पुढे म्हणाले की, हलसगीकर हे मानवतेचे संस्कार केलेले अंतर्बाह्य कवी होते. गहिवरणारा स्वर आणि आसवांनी डबडबलेले डोळे हीच त्यांची खरी ओळख होती. संवेदनशीलता बोथट होणे आणि अश्रू आटणे ही समाजाच्या ऱ्हास पर्वाची सुरुवात असते आजचा समाज त्याच दिशेने जातो आहे म्हणून हलसगीकर करांच्या कवितेचे आणि व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करणे गरजेचे आहे. असे सांगून जोशी पुढे म्हणाले की समाजात कवितेचा हुंकार अत्यंत मोलाचा व सार्वभौम असतो. सत्वशील कवीच्या कवितांचे सृजन ही समाजाची गरज आहे. त्या प्रमाणे कविता ही कालातीत देखील ठरते. पुर्वी राजसत्ता ही ज्ञानसत्तेचा सन्मान करत चालायची. म्हणजे अगदी राजेशाहीच्या काळात देखील कला व ज्ञानाला राजाश्रय असायचा. आता राजसत्ता ही धर्मसत्तेकडे वळत आहे. ज्ञानक्षेत्रातील मंडळींनी या बाबत गांर्भीयाने विचार करण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी सांगितले की, सोलापुराच्या मातीचा परिचय विद्यापीठ गीतातून होतो. हे गीत कै. दत्ता हलसगीकर यांनी लिहिलेले आहे. शिक्षणातून शेवटी मानवता धर्माचाच पाया बळकट व्हावा असा आशय त्यामध्ये उमटला आहे.शिक्षणात सर्जनशीलता महत्त्वाची आहे. असे त्याने आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले तर पुरस्कारा प्रति सुनील शिनखेड यांनी बोलताना दत्ताजींच्या कवितेने मानवतेचे संस्कार झाले म्हणून भाषा आणि साहित्यामुळे माणसाचे व्यक्तिमत्व फुलते. दत्ताजींच्या कविता भावपूर्ण होत्या असं सांगून शिनखेडे यांनी त्यांच्या कवितांना उजाळा दिला या पुरस्काराबद्दल मसाप शाखा जुळे सोलापूर आणि प्रिसिजन फाऊंडेशनची कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी डिजिटल मीडिया महाराष्ट्र राज्य संपादक पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार राजा माने, राज्य कार्यकारिणीवर पद्माकर कुलकर्णी, सोलापूर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शंकर जाधव, मानपत्राचे उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल माधव देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मसाप जुळे सोलापूर चे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्याध्यक्ष सायली जोशी यांनी प्रास्ताविक केले. तर प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. माधव देशपांडे यांनी मानपत्र वाचन केले. सुत्रसंचालन स्वानंदी देशपांडे यांनी केले.
प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे यांनी आभार मानले सृष्टी उंबरगीकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रशांत जोशी, श्रीकांत कुलकर्णी संदीप कुलकर्णी, सचिन चौधरी अमित कामतकर, रामचंद्र धर्मशाले, अचला राचर्ला हा कार्यक्रम सरकारी नियमाप्रमाणे करोनाचे नियम पाळून दूरदृष्टी प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आला.