वटवृक्ष मंदिरात यंदा परंपरेप्रमाणे होणार दत्त जन्मोत्सव, कोरोना ओमीक्रॉनच्या धर्तीवर दत्त जयंती पालखी सोहळा रद्द
अक्कलकोट, दि.१५ – श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार असलेल्या श्री गुरु दत्तात्रयांची दत्त जयंती यंदा शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी आहे. कोरोनामुळे गतवर्षी भाविकांच्या अनुपस्थितीत साध्या पद्धतीने झालेला दत्त जन्मोत्सव व दत्त जयंती सोहळा यंदा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोरोना ओमीक्रॉन व्हेरीएंटच्या धर्तीवर भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कोरोना बाबत असलेल्या शासनाच्या नियम व अटीस अधीन राहून परंपरेप्रमाणे मंदिराच्या वतीने आयोजित धार्मिक कार्यक्रम व दत्त जन्मोत्सवाने श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
श्री दत्त जयंती रोजी सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दत्त जन्म आख्यान वाचन, व भजन करून सायंकाळी ६ वाजता स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा, आरती व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होईल.
रविवार दिनांक १९/१२/२०२१ रोजी दुपारी ११:३० च्या नैवेद्य आरती नंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करणेत येईल. दुपारी १ ते ३ या वेळेत देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात येईल. कोरोनामुळे गतवर्षी खंडित झालेला परंतु सालाबादाप्रमाणे अक्कलकोट शहरातून सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत सवाद्य संपन्न होणारा श्रींचा पालखी मिरवणूक सोहळा यंदाही कोरोना ओमीक्रॉन व्हेरीएंटच्या धर्तीवर प्रशासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आला आहे.
दत्त जयंती, पौर्णिमा व शनिवार, रविवारची सुटी लक्षात घेता स्वामींच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी होणार आहे. सध्या राज्यात व देशात ओमीक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भाविकांनी मंदिरात प्रवेश करत असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. सर्वांनी या सूचनेचे पालन करणे सर्वांच्या हिताचे असून मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्व स्वामी भक्तांनी एकमेकाच्या संपर्कात न येता सुरक्षित अंतराने श्री दत्तजन्म सोहळ्याचा, श्रींच्या दर्शनाचा व भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.