अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जागृत श्री दत्त मंदिर देवस्थानच्यावतीने श्री दत्त मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन व श्री नाथषष्ठी निमित्त बुधवार
(दि. २३ मार्च) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थांनच्यावतीने देण्यात आली आहे.दरवर्षी श्री दत्तजयंती,गोकुळाष्टमी या मुख्य कार्यक्रमांसह मंदिरांमध्ये नित्यनियमाने भजन कार्यक्रम होत असतात परंतु या वर्षीपासून वर्धापन दिन सोहळा आणि श्री नाथषष्टी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन मंदिर समितीने व ग्रामस्थांनी केले आहे. त्यानुसार सकाळी १० वाजता श्री दत्त मूर्तीला अभिषेक होईल.दुपारी १२ वाजता संत एकनाथ महाराजांचा गुलालाचा कार्यक्रम
पार पडेल.त्यानंतर परमपूज्य आणणू महाराज पुजारी समाधी मठ अक्कलकोट यांच्या दिव्य सानिध्यात भजनाचा कार्यक्रम होणार आहे.त्याशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत संपूर्ण ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ६ वाजता श्री लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन दत्त मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.