वटवृक्ष मंदिरात आता आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय !
दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोटमधील भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.ही समिती प्रत्यक्षात मंदिराला भेट देईल आणि त्यानंतर उपाय योजनेचा अहवाल हा जिल्हा समितीला सादर करेल आणि त्यावरच्या उपाययोजना व सूचना ह्या जिल्हाधिकारी स्वतः मंदिर समितीला करणार आहेत,असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. आतापर्यंत भाविकांची आकडेवारी ही अधिकृत रित्या समोर येत नसल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन नीट होत नव्हते. नुकत्याच झालेल्या डिजिटल गणनेमध्ये भाविकांचा अडीच लाखांचा आकडा समोर आल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने अक्कलकोटच्या मंदिराकडे लक्ष घातले आहे.
यात मूळ म्हणजे भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि सुरक्षितता या दोन्हीकडे गोष्टीकडे लक्ष दिले जाईल,असे तहसीलदार विनायक मगर यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच जिल्हास्तरावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात अक्कलकोट येथील आगामी श्री
स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली.मंदिर प्रशासनासोबतच भाविकांना सोयी सुविधा ह्या नगरपरिषद, पोलीस व महसुल प्रशासन देत असते. यात मूलभूत काही सोयी सुविधा मंदिर समितीने करणे अपेक्षित आहे. मंदिरातील सध्याची व्यवस्था ही भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी नाही. एखादी आपत्ती निर्माण झाली तर खुप मोठी दुर्घटना होऊ शकते. गाभाऱ्यात एकदम पन्नास पन्नास ते शंभर लोक सोडले जातात. महिला, वृद्ध व मुले यांना दर्शन नीट घेता येत नाही.या सर्व बाबी जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडण्यात आल्या.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार एक समिती स्थापन करण्यात येईल. याबाबतीत ही समिती निर्णय घेईल.मंदिर समिती व प्रशासन यांचा समावेश असलेली एक समिती दोन दिवसात स्थापन होईल.ती पाहणी करेल.यात सध्याच्या व्यवस्थेत काय सुधारणा अपेक्षित आहेत याबाबत सुचना करेल.ही समिती भाविकांच्या सोयीसाठी आहे. मंदिर समिती याला मदत करेल. या समितीचे सहा अध्यक्ष प्रांताधिकारी असतील. त्याशिवाय स्थानिक अधिकारी यांचाही समावेश राहील.पाच दिवसात याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाईल.सुचना अंतिम झाल्यावर मंदिर समितीला कळविण्यात येतील व याची अंमलबजावणी मंदिर समितीला करावे
लागेल. कुठलाही अपघात वगैरे होऊ नये म्हणून या सुचना करण्यात येतील. मंदिर समितीकडुन त्या सुचनांची अंमलबजावणी अपेक्षित आहे,असे तहसीलदार मगर
यांनी सांगितले.या बैठकीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अधिकारी, प्रांताधिकारी,वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, मुख्याधिकारी रमाकांत डाके आदिंसह गट विकास अधिकारी, उपविभागीय अभियंता, पोलीस निरिक्षक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उपकार्यकारी अभियंता, भूमि अभिलेख उप अधिक्षक, आगार व्यवस्थापक यांची उपस्थिती होती.