ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ नामकरणाची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्य सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ असे नामकरण करून त्यांच्या स्मृती जपाव्यात, अशी विनंती त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, महिलांना सामाजिक सन्मान देणारी योजना आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अजित पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांच्या दूरदृष्टीतूनच या योजनेला गती मिळाली. त्यामुळे या योजनेला अजित पवारांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याला दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना मोठे आश्वासन दिले आहे. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय मी थांबणार नाही, असे सांगत त्यांनी लवकरच या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले. भावनिक भाषेत संवाद साधत त्यांनी महिलांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुसरीकडे, आर्थिक पाहणी अहवालात लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या महसुली तुटीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्याने तिजोरीवर ताण वाढल्याचेही अहवालात नमूद आहे. त्यामुळे योजनेभोवती आर्थिक आणि राजकीय दोन्ही बाजूंनी चर्चा तीव्र झाल्या आहेत.

जून २०२४ मध्ये सुरू झाल्यापासून ही योजना सतत वादात राहिली आहे. लाभार्थ्यांच्या नावांतील कपात, ई-केवायसी अडचणी, तसेच इतर विभागांचा निधी या योजनेकडे वळवण्यात आल्याच्या आरोपांमुळेही सरकार अडचणीत आले होते. मात्र तरीही ही योजना बंद होणार नसल्याचे सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, अर्थखात्यानेही योजनेमुळे आर्थिक ताण वाढत असल्याचे पूर्वी मान्य केले होते. तरीही अजित पवार यांनी या योजनेवर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली होती. त्यामुळे आज या योजनेला त्यांचे नाव देण्याची मागणी अधिक भावनिक आणि राजकीय वजन घेऊन पुढे आली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!